Friday 20 December 2019

प्रचितगड किल्ला ट्रेक वर्णन : अमोल घाणेकर

*प्रचित गड शृंगारपूर संगमेश्वर*
   4 वर्षा पासून विशु (विश्वनाथ गुरव पार्ले ट्रेकर्स अध्यक्ष )ला बोलत होतो प्रचित गडावर जाऊया पण जाण्यासाठी योग काही येत नव्हता या वेळी मात्र ठरवून टाकलं जायचेच. 
मोहीम मुक्रुर..... आदेशाचे फर्मान निघाले तातडीने शृंगारपूरास जाऊन प्रचित गड जवळ करणे.... घोड्या चे लगाम खेचले गेले मातीचे धूलीकण उधळीत मराठे वा-याच्या वेगाने दौड़त निघाले..... हर हर महादेव.....!!!
जय भवानी....!!!
छत्रपती शिवाजी महाराज की जय....!!!  
छत्रपती संभाजी महाराज की जय....!!! 
  जयजयकार करत 13 डिसेंबर रोजी रात्री 12 वाजता विलेपार्ले वरुन निघालो. गप्पा टप्पा होत होत्या राजेंद्र बुवा नी गणेश स्तवन म्हणून भजनाला सुरुवात केली हरी नामात तल्लीन होऊन प्रवास सुरु होता एवढयात समजले की आमच्या बस ची एक हेडलाईट चालू नाही मग कमी गतीने मार्गक्रमण करत आमची बस निघाली त्यामुळे सकाळी 9 वाजता आम्ही चिपळूण येथे होतो. आज गड फेरी पूर्ण करण्यास खुप उशीर झाला असता म्हणून मग आम्ही डेरवण येथे शिवसृष्टि पाहण्यास गेलो. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग पुतळ्याच्या रुपात कोरले आहेत स्वामी समर्थ चे मंदिर आणि आजुबाजूला मावळे पाहुन आपण 350 वर्षे मागे शिव काळात आहोत असा भास होतो.
     तिथून निघालो #कर्णेश्वर_ मंदिर_कसबा_संगमेश्वर# 
वाजले होते 11 वाजून 35 मिनिटे.
 #संगमेश्वर येथे अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री या नद्यांचा संगम होतो. या नद्यांच्या संगमस्थळी कर्णेश्वर हे प्राचीन हेमाडपंती मंदिर शतकानुशतकं उभं आहे. अंदाजे सोळाशे वर्षांपूर्वी करवीरच्या राजघराण्यातील `राजा कर्ण` याने इथे या भव्य मंदिराची उभारणी केली असं सांगितलं जातं. अस ही सांगितलं जातं की हे पांडव कालीन मंदिर आहे आणि हे एका रात्री मध्ये बांधण्यात आले आणि आहे ज्यावेळी पांडव सगळे जेवायला बसले असताना देवीच्या रूपात कोंबडा आवरला आणि त्यांना वाटल की सकाळ झाली म्हणून त्यांना तिथेच ताट उपडी करून ठेवली आणि ते तिथून पुढे जाण्यासाठी निघाले अजुन ही अस सांगितलं जात की देवळाच्या घाभाऱ्यांमध्ये एक लेख लेखी स्वरूपात आहे तो लेख जो कोणी वाचले आणि त्याचा अर्थ बरोबर लावेल त्यावेळी ती उपडी असलेली ताठ सरळ होतील.
एक अतिशय देखणं मंदिर म्हणून कर्णेश्वर मंदिराचा उल्लेख करता येईल.
हे पूर्वाभिमुख मंदिर २६ मीटर लांब व २३ मीटर रुंद आहे. मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर प्रचंड मोठा सभामंडप व त्यापुढील गाभारा असून त्यात श्री कर्णेश्वराची पिंड व पार्वतीची मूर्ती आहे. हे संपूर्ण मंदिर दीड मीटर उंचीच्या चौथऱ्यावर उभारलं आहे. मंदिराला सोळा कोन व पाच घुमटांचे शिखर आहे. पाचव्या घुमटाचं टोक तळापासून २५ मीटर उंचीवर आहे. या पाच घुमटांशिवाय इतरही ३३ छोटे घुमट इथे आहे.

संगमेश्वरमधील या मंदिराचा परिसर अत्यंत शांत व रमणीय आहे. मंदिरावर अप्रतिम शिल्पसौंदर्य कोरलेले आहे.
महाद्वार, मुख्य मंडप, नंदीमंडप आणि भिंतींवर कोरलेल्या अष्टभैरव, द्वारपाल, शंकर, देव-दानव, यक्ष, नृत्यांगना यांच्या प्राचीन प्रतिमा या गतकालीन शिल्पवैभव आपल्यासमोर उभे करतात. कसबा संगमेश्वर या नावने हा परिसर ओळखला जातो व येथील विविध हेमाडपंती देवळांमधे अतिशय सुंदर शिल्पं पाहता येतात . स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर पाहुन मन प्रसन्न झाले. मंदिर परिसरात असलेल्या सूर्य मंदीराचे दर्शन घेऊन आम्ही निघालो, पुढे काही अंतरावर संभाजी राजेना दगाबाजी ने पकडले ते ठिकाण पहिले तिथे संभाजी राजे चा पुर्णकृती पुतळा आहे सध्या तिथे अजुन काम चालू होते. 
   आता निघालो सप्तेश्वर मंदिरात मुख्य रस्त्यांपासुन 20 25 मिनिटांच्या अंतरावर एका शांत जागी हे मंदिर आहे आजुबाजुला हिरवीगार झाडे आणि धिरगंभीर शांतता. गर्भगृहात जाऊन दर्शन घेतले उजव्या बाजुला चा एक छोटे वैजनाथ चे मंदिर आहे. तिथून पुढे काही अंतरावर सात पाण्याचे झरे आहेत त्यातून पाणी एका ठिकाणी जमा होन्यासाठी टाके बनवले आहे त्यातील पाणी काढून तहाण भागवली बाजूलाच चिरेबंदी हौद आहे त्यात खुप छोटे छोटे मासे आहेत पाण्यात पाय सोडून बसलो की ते येउन आपले पाय चावतात त्यामुळे गुदगुल्या होतात ही एक मसाज थेरपी आहे ते मासे आपली मेलेली स्कीन खाऊन टाकतात त्यामुळे खुप लोक हे शहरात पैसे देऊन करतात आम्ही मात्र निसर्गा कडुन फुकटात करुन घेतले सर्व शीण नाहिसा झाला पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती मंदिरात जाऊन घरातून आणलेली शिदोरी सोडली कृष्ण काला करायचा त्याप्रमाणे नानाविधी पदार्थांवर ताव मारला उदर भरण झाले आणि आता मुक्कामाच्या ठिकाणी निघालो आमचे मित्र महेश हेमन यांच्या धामणी आंबेड या गावी पोहोचलो चहा घेतला आणि गावात एक फेर फटका मारला विहीर, बैल,पाहत एका ठिकाणी पपई चे झाड होते त्यावरील पपई काढली आणि लगेच तिची सुमधूर चव चाखली ही.... एव्हाना मावळतीला दिनकर क्षितीजावर विविध रंगाची उधळण करत अस्ताकडे निघाला... महेश यानी स्वता बनवलेल्या रुचकर जेवण जेवलो आणि झोपी गेलो.
 15 डिसेंबर पहाटे सकाळी 4 वाजता उठलो गरमा गरम चहा घेतला आणि महेश यांच्या दादा वहिनी आई बाबा यांचा निरोप घेतला.त्यानी केलेल्या सहकार्य बद्द्ल धन्यवाद....!!!
    प्रसन्न वातावरण, हवेत गारवा होता. पांढरे शुभ्र धुक्याची चादर ओढून निसर्ग सजला होता गणपती बाप्पा चे नाव घेत गाडी निघाली होती शृंगारपूर प्रचित गडा कडे शास्त्री पुलाजवळ आलो इथे दोन मावळे साखरपा वरुन दुचाकी ने येणार होते काल 5 तास आमची वाट पाहुन परत गेले होते काही वेळात ते आले मग सुसाट निघालो शृंगारपूरला...!!!
 अंतर 15 किलोमीटर पूर्वेला अरुणाचा सप्त रंगाची उधळण करत उदय होत होता. 7 वाजून 20मिनिटांनी शृंगारपूर गावात पोहोचलो झुंजूमुंजू झाले होते, गावतील लोकांनी आपल्या दिनक्रमाला सुरुवात केली होती एवढयात एक 60 65 वर्षे वयाचे काका विचारपूस करायला आले. कोकणात आपल्या ला अशी मायेने विचारणारी माणसे भेटतातच,आम्ही त्याना दिशामार्गदर्शक म्हणून याल का असे विचारले ते हो म्हणाले, त्याच्या घराजवळ आलो ते घरी जाऊन काठी, आकडी कोयती बांधून तयार होउन आले आम्ही त्यांच्या सोबत शास्त्री नदीच्या काठावरुन प्रचित गडावर जाण्यासाठी मार्गस्थ झालो. 8 वाजले होते सूर्य नारायणाचे दर्शन घेत आम्ही पार्ले ट्रेकर्स चे 18 मावळे पायवाटेने चाललो.... दोन्ही बाजूला दाट हिरवीगार झाडे आणि मधून पाऊल वाट तुडवत झपाझप जात होतो, आमचे मार्गदर्शक काका आम्हाला गावतील, गडा वरील माहिती पुरवत होते. 45 मिनिटे झाली होती पिण्यायोग्य पाणी पाहुन थांबलो कारण या नंतर गडावर पोहोचे पर्यंत पाणी मिळणार नाही म्हणुन सोबत बॉटल भरुन घेतल्या आणि निघालो. जास्त वर्दळ नसल्याने खुप जंगल माजले आहे त्यामुळे झाडाच्या फांद्या वाटेत येत त्या तोडत ते काका पुढे चालत होतो. आता थोडी चढणीची वाट लागली प्रत्येकाला धाप लागली होती आता जवळ जवळ सव्वा तास झाला वर डोंगरावर आलो समोर गड खुणावत होता पण अजुन आम्हाला पायथा गाठायला 1 तास लागेल असे समजले तसे पाणी पिण्यासाठी थांबलो गावतील भैरी भावनी चे मंदिर आता खुप लांब दिसत होते. आजुबाजूला सुकलेले गवत तुडवत तुडवत 80 ते 90 अंश कोणातील खडी चढण चढून गड पायथ्याशी पोहोचलो तेव्हा 2 तास झाले होते. काही मावळ्यांना 
प्रकृति अस्वथ मुळे माघार घ्यावी लागली आणि त्यानी ती मान्य केली कारण निसर्गा पुढे आपण मानव काहिच नाही. पाच मावळे माघारी गेले. मग आम्ही छोटी विश्रांती घेतली आणि पुढिल चढाई सुरु केली. आता खरी कसोटी लागते कारण निसरडी माती आणि अरुंद वाट एका बाजूला खोल दरी किवा कार्विची झाडे आणि खडी चढण काही ठिकाणी तर खूपच घसरणारी माती आहे, तिथे लोखंडी शिडी लावण्यात आल्या आहेत. यात 2 मोठ्या आणि 6 छोट्या अशा 8 शिड्या आहेत त्या पार करायला खुप दमछाक झाली मोठ्या शिड्या ना 24 पाय-या आहेत.
आता आडवी वाट लागली चालत चालत गडाला अर्धी प्रदक्षिणा घातली तरी गडाचे प्रवेशद्वार अजुन ही दिसत नव्हते, हवेत गारवा आणि दोन्ही बाजूला कार्विची झाडे त्यामुळे उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. आत्ता पुन्हा चढाई लागणार होती त्या आधी एक छोटी विश्रांती घेतली. याच जागेवर दोन वर्षांपूर्वी एक गिर्यारोहक या गडावरुन पडुन मृत झाला होता त्याची आठवण म्हणून त्याच्या मित्रांनी त्याच्या नावाची पाटी लावली आहे. पुन्हा बिकट वाटे वरुन चढाई ला सुरुवात केली छोटी वाट आणी घसरणारी माती यातुन सावरत कसरत करत पुढे एका लोखंडाच्या शिडी जवळ आलो आता पर्यंत ची ही सर्वात मोठी शिडी जिला पहिले की काळिज धडधडते. का विचारताय....???
सांगतो.... या शिडीच्या सुरुवातीच्या काही आणि मधिल काही पाय-या तुटलेल्या होत्या साइड रेलींग हलत होत्या पण उभे गज मात्र चागल्या स्थितित होते त्यावरून चालत डोंबारया सारखी कसरत करत शिडी पार केली आणि सामोर च 10 12 पावलांवर गडाचे प्रवेशद्वार दिसले चौकट तुटलेली आहे फक्त उंबरठ्यावर काही अवशेष शिल्लक आहेत , हर हर महादेव चा गजर करत वंदन केले आणि गड प्रवेश केला बाजुला एक पाण्याचे मोठे टाके आहे त्यातील पाणी सध्या पिण्यायोग्य नाही. तसेच पुढे गेलो की भैरी भवानी चे मंदिर आहे गावातील लोकानी एक पत्र्याची शेड उभारली आहे. मंदिरात भैरी आणि भवानी ची मुर्ती आहे भैरी ची मुर्ती कोणी तरी तोडली आहे. भवानी ची मुर्ती पद्यासनात बसली असुन मुर्ती मधे अलौकिक तेज आहे. संक्रांती ला एथे देवीचा उत्सव साजरा केला जातो असे आमचे दिशादर्शक वामन मस्के काका यानी सांगितले. मंदिरा जवळ 5 जिवंत तोफा आहेत. पुढे खाली तटबंदी च्या बाजुला पाण्याची टाकी आहेत यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे यात खाली उतरण्यासाठी पाय-या आहेत अशी एका रेषेत सात टाकी आहेत आणि ती आतून एकमेकांना जोडलेली आहेत 2 नंबर टाके चागल्या स्थितीत आहे बाकी ची दगड माती ने भरली आहेत, त्यातील अमृत जल सदानंद ने काढले आम्ही ते प्यायलो थोडे ताजेतवाने वाटले तटबंदी वरुन चालत असताना समोर च चांदोली अभयारण्य दिसते त्या बाजूच्या हिरव्या गार मनोहारी प्रदेशाचे दर्शन घडते, अशी हिरवीगार वनसंपदा पाहिल्यावर फोटो काढायचा मोह मला न झाला असे होणार आहे... !!! मग फटाफट क्लिक केले आणि पुढे निघालो. संपुर्ण गडावर एकच उंबराचे झाड आहे तिथे जाऊन सर्वजण विसावलो. गडावर राजवाड्याचे अवशेष आहेत. तटबंदी सध्या अस्थीत्वात नाही. संपुर्ण गड फेरी पूर्ण करण्यास 1 तास 30 मिनिटे लागतात.
 # प्रचित गड_ गिरिदुर्ग _ उंची 3200फूट _ चढाई _ अती कठिण _ डोंगर रांग _ सह्याद्री #
 प्रचित गडाचा वापर हा प्रमुख्याने कोकणातून घाटावर जाणा-या रेडे घाटावर नजर ठेवण्यासाठी केला जात असे .
1661 मधे शिवाजी महाराजांनी उंबर खिंडीत कार्तलब खानाचा पराभव केला आणि ते दाभोळ कडे निघाले वाटेत मंडणगड आणि पाल गड आहेत त्यावर स्वारी करतील म्हणून आदिलशहा चे सरदार सुर्वे यानी घाबरुन मंडनगड सोडला आणि शृंगारपूरला आले राजे नी शृंगारपूर वर हल्ला केला व शृंगारपूर जिंकले पिलाजी शिर्के ना शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील करून घेतले.
त्यांची कन्या जीऊबाई यांचा विवाह संभाजी राजे सोबत केला. त्यांचे लग्ना नंतर चे नाव येसुबाई.
शिवाजी महाराजांच्या राजकुवर या कन्येचा विवाह पिलाजी चा मुलगा गणौजी शिर्के यांच्याशी करण्यात आला.
    दक्षिणदिग्विजया साठी शिवाजी राजे गेले तेव्हा संभाजी महाराजांची शृंगारपूर चा सुभेदार म्हणून नेमणूक झाली,त्यामुळे संभाजी राजे चे येथे काही महीने वास्तव्य होते. येथील निसर्ग सौंदर्य पाहुन संभाजी राजे मधिल कवी आणि लेखक जागा झाला आणि त्यानी संस्कृत भाषेत बुधभूषण हा ग्रंथ लिहिला,तर नाईकाभेद,नखशिखांन्त हे ब्रीज भाषेतील ग्रंथ लिहीले.
 अशा प्रकारे या गडाला आणि शृंगारपूरला इतिहासिक वारसा लाभला आहे. 
सदा ने मंदिरात पूजा करुन देवीला श्रीफळ अर्पण केले आणि आम्हांला सुखरुप गडावर आणले म्हणून आभार माणून आम्ही 1.30 वाजता गड ऊतरण्यास सुरुवात केली. मजल दरमजल करत 5 वाजता शृंगारपूर गावात आलो. गड चढाई करण्यास जेवढा त्रास झाला नाही त्यापेक्षा जास्त त्रास उतरण्यास झाला उभे राहिले तरी पाय आपोआप थरथरत होते. *"प्रचित गडाची चढाई केल्याशिवाय याची प्रचिती येणार नाही "*
हा अनुभव आयुष्यत एकदा सर्वानी घ्यायलाच हवा. 
जर आपल्याला जंगल ट्रेक करायचा असेल रानावनातून भटकंती करायची असेल स्व:ता मधे किती ताकत आहे ती आजमावायची असेल आणि सह्याद्री चे रौद्र भीषण रुप अनुभवायचे असेल तर एकदा नक्किच प्रचित गडाची प्रचिती घ्याच.
शास्त्री नदीत आंघोळ केली थोडे बरे वाटले.
आमचे दिशा दर्शक वामन मस्के हे   
शृंगार पूर गावचे माजी सरपंच आहेत यांच्या घरी चहा घेतला आणि त्यांचा निरोप घेऊन निघालो. गाडी जवळ आलो आमचे 5 मावळे भेटले त्यानी मस्त मेगी बनवली होती तिच्यावर सर्वानी ताव मारला माझा उपवास असल्याने मी राजगिर्या चिक्की घेतली तेव्हडाच पोटाला आधार...!!!
7 वाजता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो पण हा प्रवास इतका खडतर होईल असे वाटले नव्हते 6 वेळा गाडीचे टायर नादुरुस्त.....महाड मधे झाले तेव्हा आम्ही बाबा साहेब आंबेडकर यानी चवदार तळ्यावर सत्याग्रह केला ते स्मारक पाहुन आलो 11वाजता निघालो दुपारी 1 वाजता भर रस्त्यातच टायर फुटला कहरच झाला..... नशिब बलवत्तर म्हणून वाचलो. सोमवारी 9 वाजता पोहोचणे अपेक्षीतअसताना सायंकाळी 6 वाजता विलेपार्ले पुर्व ला आलो.
   अशा प्रकारे पार्ले ट्रेकर्स चा स्वप्नवत ट्रेक पुर्ण झाला यात सहभागी मावळे विश्वनाथ, निलेश,अमित,प्रमोद,महेश हेमन,सदानंद,शितम,सूर्यकांत,
सुशांत,रोशन,स्वप्निल,राजेंद्र,
सतिश,सागर,विकी,सुरज,आणि अविनाश घडशी(you tub वर स्व:ता चे चेनल) या सर्वांचे आभार आणि साखरपा मधून आलेल्या त्या 2मित्रांचे आभार तुमच्या माझा हा ट्रेक संस्मरणीय झाला.
          🖋 अमोल राजे.
                  ( विलेपार्ले पुर्व )
  
टीप- 
१} अविनाश घडशी याच्या यु ट्यूब सन्केतस्थळा वर प्रचित गडाचा माहिती पट पाहता येईल.
कोकणकर अविनाश.
२} हा गड पहायचा असल्यास मार्ग दर्शका शिवाय जाऊ नये.
गावतील मार्ग दर्शक सोबत घेऊन पुढची वाटचाल करणे.
वामन मस्के माजीसरपंच शृंगारपूर.
9405430426.

No comments:

Post a Comment