Tuesday 3 December 2019

राजगड - तोरणा - लिंगाणा - रायगड ट्रेक | Rajgad - Torna - Lingana - Raigad Trek | गडभ्रमंती

जय शिवराय... !!!
स्वप्नपूर्ती...... 🚩😍
मोहीम - स्वराज्याच्या एका राजधानी पासून स्वराज्याच्या दुसऱ्या राजधानी पर्येन्त, मुरुंब देवाच्या डोंगरापासून ते रायरीच्या डोंगरापर्येंत, "गडांचा राजा, माझ्या राजियांचा गड" असे संबोदल्या जाणाऱ्या किल्ले राजगडा पासून जिथे बत्तीस मन सोन्याचं राज सिहांसन सजल, जिथे वाऱ्याला ही आत शिरता येत नाही असा दुर्गदुर्गेश्वर किल्ले रायगड पर्येंत पायीवारी ठरवली.
किल्ले राजगड - तोरणा गड - लिंगाणा दुर्ग - दुर्गदुर्गेश्वर रायगड
बरेच दिवसापासुन ही मोहीम लांबवली होती पावसाच्या तडाख्यात पुणे झोडपल्यामुळे, कधी माझ्या खासगी कारणामुळे पण अखेर दिवस ठरला २२ नोव्हेंबरच्या रातीला निघायच, श्याम भाऊनी इंत्यभुत माहीती श्री अरुण पाटील(रानवारा) यांच्याकडुन काढली. किल्ले राजगड ते किल्ले रायगड ला जाताना जोडली जाणार्या गावाची, दर्याखोर्याची, नद्या-नाळांची सर्व माहीती जमवली त्यावरुन कीती वेळ लागेल प्रत्येक टप्प्यावर यांचा अंदाज काढला आणि मोहीम २ दिवसात फत्ते करायची आणि जर उशिर झालाच किंवा अंदाज चुकला तरी तिसरा दिवस राखीव ठेवला होता.
दिवस ठरला आणि ठरल्या दिवशी शुक्रवार दिनांक २२/११/२०१९ ला दादर स्टेशनहुन सुमारे राञी ११:५३ वाजताची गाडी चैन्नई मेल पकडण्यासाठी जमले, पण दादर ला आल्यावर मेल रद्द झाल्याच समजल, मग श्याम भाऊनी मला कल्याणला जाऊन पुढची कोणती गाडी आहे का बघायला सांगितले, राञी ०१:०२ अजमेर वरुन येणारी मेल आहे हे माहीत पडताच सगळे कल्याणसाठी रवाना झाले, तो पर्यत गणेश भाऊ नाईट डुट्टी असुन पण कामावर फक्त तोंड दाखवुन कल्याणला हजर झाले. त्यांना भुक लागल्याने त्यांनी अंडा-पाव खाला व आम्हांला पण बांधुन घेतला मला ते तिथेच खायला आग्रह करत होते पण मी नुकतच चिकन-वडे खाल्ले होते😜😜😜
असो, बरोबर १ वाजता आमचे बाकीचे मावळे कल्याण ला आले पाठोपाठ मेल पण आली, जनरल बोगी फुल असल्यामुळे शयनयान बोगीत जाऊन बसलो, बसलो कुठे अक्षरशहा आडवे झालो😆😆😆
बरोबर सकाळच्या ४ वाजता पुणे स्थानक गाठल. माझा पुण्यातला अनिकेत जाधव मिञ आहे त्यांने मला पुणे ते किल्ले राजगड साठी एक चारचाकीचा बंदोबस्त केला. गाडी घेऊन येणारा सुरज जाधव पोहचेपर्यत आम्ही पुण्यातील मस्का चहा पियालो भर थंडीत उबदार वाटणारे हे माझ्यासाठी एकच पेय आहे.
चहा बिस्कीट संपतोय तो पर्यत राजधानीकडे घेऊन जाणारा आमचा रथ आमच्या समोर उभा ठाकला. आमच्याच वयाचा हसरा व खेळकर असल्याने पुण्याबद्दल बोलता बोलता केव्हा गुंजवणे गावात पोहचलो कळलेच नाही.
दोन वर्षापुर्वी ज्याठीकाणि २-२ वडापाव रिचवले होते त्यांच ठीकाणी चहा नास्ता केला व नंतर सुरज जाधव ह्यांना रजा दिली आणि आम्ही सज्ज झालो या सह्याद्रीची सैर करायला.....
ह्या सह्याद्रीची सैर करण सोपी गोष्ट नाही, सह्याद्रीची सैर फक्त तिघेच करु शकतात एक वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे...
वाघ नी वारा तर सह्याद्रीत राहतो आणि आता मराठे सज्ज झाले होते....
"जय भवानी, जय शिवराय" ह्या आरोळीने शांतता भंग करत किल्ले राजगडच्या रोखाने पाच धुलिकण उधलले श्री. श्याम घुलघुले, श्री. गणेश साळवी, श्री. प्रसाद मेस्ञी, श्री. अविनाश घडशी आणि मी {श्री. महेंद्र लिगम}, साडेसहाला किल्याची वाट धरली. झपझप करत किल्ला सुटले सगळे, ठरल्या प्रमाणे व वेळेत करायच असल्याने बोलण कमी नी चालण महत्वाच होत. प्रत्येकाच्या बॅगा १० कीलोपेक्षा जास्त जड होत्या ३ लिटर पाणी, २ टोप {माझ्याकडे}, ३ जोड्या कपडे, अंथरुन-पांघरुन, मॅट, स्वेटर, सुखा खाऊ अस बरच काही.......पण ह्या निर्सगात फिरताना ह्या पाठीवरच्या वजनाचा भार वाटतच नाही. गार वारा, पशु-पक्षी, सुर्यौदय, शांतता ही एक वेगळीच दुनिया जाणवते, तर सकाळच्या ८:३० च्या सुमारास चोर दरवाज्यातुन आमचा गडप्रवेश झाला. चोर दरवाज्यांत काही छायाचिञे टिपुन आम्ही पद्दमावती तलावातील पाण्याने ताजेतवाने झालो आम्ही तसेच आई पद्दमावती मंदीरात जाऊन नतमस्तक झालो, त्यानंतर रामेश्वर मंदीर व मग छञपती शिवरायांनच्या पहील्या पत्नि सईबाई मातोश्री यांच्या समाधी ला वंदन करुन तिथेच काही वेळ स्तब्ध उभा राहीलो.... पहीला टप्पा वेळेत पार झाला असल्याने रामेश्वर मंदीरा बाहेरच शिदोरी खाल्ली आणि पद्दमावती माची ठीक ९:१५ ला सोडली आणि आमची पावल संजिवनी माचीकडे वळली, दुरुनच बालेकिल्याला मुजरा केला, एकेकालच राजियांचा निवासस्थान होत ते, संजिवनी जवळ पोहचलो, माचीची कल्पकता निराळीच आहे. स्वतः शिवरायांनी तिथे दुहेरी बुरुज बांधुन घेतला व किल्ल्याला दुहेरी तटबंदी चढवली, त्यांना ८ दरवाजे काढले कारण ही किल्याची नाजुक बाजु होती, पण शिवराय सामान्य तत्ववेते नव्हते आणि राजधानीचा गड कसा असावा यांची प्रचिती तिथे येते.....संजिवनी माचीवरील अलु दरवाजाने किल्ला सोडला.
अलु दरवाजातुन किल्लातुन बाहेर सुमारे ९:४५ ला पडलो आणि संजिवनी माचीला वळसा घालुन किल्ले तोरण्याची वाट धरली, संजिवनी ला वळसा मारत असताना बाहेरुन दिसणारी संजिवनीची तटबंदी अजुनही अभिमानाने डौलात उभी आहे, आजही तिचा तो दिमाख पाहुन वाटत त्याकाळी तर शञुच्या मनात धडकीच भरत असेल. किल्ले राजगडावर झालेल्या फराळाने व आरामाने परत ताजेतवाने होऊन पटपट निघालो..."बघ पुढे, हो म्होर"... थोड पुढे आल्यावर तोरण्याच्या वाटेवर बाजुला भुंतोडे गावात जाणारी वाट दिसली......आम्ही तिला उजविकडे ठेऊन आमच्या वाटेने निघालो....आता सुर्यनारायणाची झळ जाणवु लागली, टेकडी वरुनच तोरण्याची वाट असल्याने सुर्यदेवाचा रोष सोसावा लागत होता. किल्ले राजगड सोडल्यापासुनच किल्ले तोरणा नजर टप्प्यांत होता, ती फुसटशी दिसणारी आकृती मनात नवी प्रेरणा व उर्जा देण्यास पुरेशी होती. पालखिंड पार करुन पुढे आल्यावर तोरण्यावरुन येणारा एक ग्रुप दिसला...त्यांच्याकडुन तोरण्याला अजुन कीती वेळ लागेल ह्यांचा अंदाज घेतला व आम्ही त्यांना राजगडावर जाणारा मार्ग दाखवला. वाटेवर चालत असताना एक काका भेटले त्यांच घर बरोबर दोन्ही किल्यांनच्या मधोमध आहे, त्यांच्या मागोमाग त्यांच्या शेतात एका विस्तिर्ण झाडाजवळ डेरा टाकला...एक-एक ग्लास ताकाच रिचवल आणि पुन्हा १०-१५ मिनीटांनी मार्गक्रमण सुरु केल. चढ-उतार, चढ-उतार करत किल्याजवळ पोहचलो......काय ते अफाट सौदर्य.....अरे अश्याच किल्ल्यानसाठी तर आपल्या मावळ्यांनी आयुष्याची होळी करत हे स्वराज्य राखलं....सगळा थकवा_मरगळ एका क्षणात नाहीशी झाली...किल्याच्या शेवटच्या चढणीने आमच्या सर्वानच्याच पायात गोळे आणले...सरळ उभी चढण असल्याने आणि पाठीवर वजन पण किल्ला सर होतोय या जाणिवेमुळे मन उल्लासित होत होत. अखेर ४:१५ तासाच्या प्रवासाने आम्ही गडात प्रवेश केला व बुधला माचीवर येऊन बसलो... आमचा दुसरा टप्पा पार पडला. अाम्हांला राजगडाकडुन येताना पाहुन किल्यावर असलेले हौशी मुलांनी राजगडाबाबत व लागणार्या वेळा बाबत विचारणा केली, आम्ही आमच्या परिने सर्व माहीती त्यांना दिली व पुढे श्री रायगड जवळ करायला चालोय हे सुध्दा सांगितले, हे ऐकुण ते आश्चर्यचकीत होऊन आम्हांला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ लागले. गडावर असलेल्या काही गावतल्या जनतेकडुन वाळंजाईच्या वाटेबद्दल विचारणा केली. त्यांनी ती वाट आहे असे सांगितले खरे पण घनदाट जंगलाची व घसरती आहे असे सांगितले, त्यांनी वेल्हा गावात ऊतरा असे सांगितले पण त्यांत आमचे अजुन ४ तास वाढले असते, त्यामुळे काहीही झाल तरी वाळंजाईनेच जायचा बेत ठरला वाळंजाईच्या महा दरवाज्यांत आम्ही दुपारच जेवण उरकल व मग श्याम भाऊ व अविनाशने पुढील मार्गाची शहानिशा केली....
तोरण्याचीसाथ राज्यांना स्वराज्य स्थापने पासुन भेटली. महाराजानी १६ व्या वर्षी म्हणजे १६४६ ला तोरण्यावर भगवा फडकवला. हा पहिला किल्ला व पहीली लढाईने गड ताब्यात आला. गडाचं रौद्र रुप, गरुडाच्या बसकणी प्रमाणे असल्याने व प्रचंड आवार असल्याने पुर्वीच नाव प्रचंडगड असे होते, पण ज्या दिवशी हा गड राजांनी स्वराज्यात आणला आणि स्वराज्याच तोरण ह्या किल्याने बांधल्याने किल्ले तोरणा हे नाव देण्यात आले. किल्याची बांधणी करत असताना महाराजाना इथे गुप्तधन सापडले, व यवनानच्या गुलामगिरीतुन सोडवल्यामुळे तोरणाई देवी पण प्रसन्न झाली. जवळ जवळ २:४५ च्या सुमारास वाळंजाई दरवाजातुन गडाला मुजरा करुन भट्टी गावाची वाट धरली.
किल्ले तोरण्याला रामराम करुन, पुढे मार्गस्त झालो. निसरडीवाट व एक पाऊल मावेल इतकीच वाट ती पण गवताने आच्छादली आणि बाजुला खोल दरी, जराशी चुक झाली तरी बिन बोंभाट गड पायथा गाठता येईल इतकी भयावह होती. सर्वच जण संभाळुन एकमेकाची काळजी घेत उतरत होतो. वाट आडवळणाची असली तरी दुरुनच भट्टी गाव दिसत होते. काटेरी झाडी असल्याने अधुन मधुन ओरबाडे निघत होते जवळ जवळ २ तासानी म्हणजे ४:३० वाजता भट्टी गावात आलो. गावातल्या लोकांकडुन पासली गावापर्यत गाडी आहे अस माहीत पडल्यावर पासलीपर्यत बसने प्रवास केला. ६:०० वाजता पासली गावात उतरुन चहा नास्ता करुन मोहरीची वाट धरली. पासली ते मोहरी जवळ जवळ १४-१५ किमी त्यात अंधार पडत चाललेला पण सगळ्यांचच एकमत, कीतीही झाल तरी मोहरी गाठायची. हातात काठी नी पाठीवर बॅग चढवुन निघालो सरसर करत, वाट विस्तिर्ण व चांगली असल्याने बिनघोर निघालो. गावातल्या लोकांनी तुम्ही २ तासात पोहचाल अस सांगितल खर आणि आम्ही पण मोठ्या मनाने ते समजुन घेतल पण त्यांचे २ तास हे आमचे ४ तास हे नाही सांगितले राव🤪🤪🤪......
चालतोय...... चालतोय......चालुन-चालुन भर थंडीत अंग तापु लागलं आन थांबल तर थंडी लागे पण गाव अंधारात गुडुप झालेल. मोहरी कडुन येणार्या प्रत्येक गाडी आमची विचारपुस करत होती, त्यांना वाटत होत लिंगाणा सर करायला जाणारी टोळी असावी कारण लिंगाणा ट्रेक चालु होता शनिवार- रविवार पण जेव्हा त्यांना समजायच किल्ले राजगड ते दुर्गेश्वर रायगड मोहीम आहे तेव्हा आमच्यावर अभिनंदनाचा वर्षाव व्हायचा......बस एखाद्या ट्रेकर्सला ते ४ बोल स्फुर्ती द्यायला पुरेसे आहेत. जवळ जवळ १० वाजता आमचा तिसरा टप्पा म्हणजे मोहरी गावात पोहचलो. आरती ताईच्या घरी गरमा गरम नाचणीची भाकरी, बटाटा भाजी, ठेचा, लोणचे, डाळ-भात यावर आडवा हात मारला आणि सरळ गोठ्यामधे मॅट अंथरुण, अंगाला सिल करुन झोपी गेलो......थंडीत चा प्रभाव असतानाही थकव्यामुळे व दिवसभराच्या परिश्रमामुळे सगळे लगेच गार झालो......
दिवस दुसरा....
सकाळी ६ वाजता श्याम भाऊ व प्रसाद भाऊनी आमची झोपमोड केली...पटापट बॅगाभरुन चहा व गरमागरम मॅगी खाल्ली तो पर्यत आमचा वाटाड्या श्री. दगडु मोरे आले. आमच्यासाठी हातात ताकाची बाटली घेतलेली, सडपातळ शरीरयष्टी, स्वभाव गोड, स्पष्ट बोलण...... जाम भारी माणुस आणि मग आरती ताई व त्यांच्या परिवाराला रामराम बोलुन निघालो लिंगाण्याच्या दिशेने ठीक ७:३० वाजलेले...पहीली वाट सरळ सरळ थेट बोराट्याच्या नाळेपर्यत, आम्ही पुर्वी एकदा बोराट्याच्या नाळेतुन चढ उतार केला होता जेव्हा २०१७ ला "बा रायगड" परिवारासोबत लिंगाणा सर केला तेव्हा, पण तेव्हा उतरताना पण अंधार व चढताना पण अंधारच होता.....परंतु आता माञ खोलपणा जास्त भयानक भासत होती, जराशी चुक सगळ्या पण महागात पडणार होती. पाऊल जोखुण व मापुन टाकत होतो, माणसाच्या उंची इतकी मोठ मोठी कातळ दगडी कसबसे ते संपतोय तोच उजवीकडे वळुन लिंगाण्याकडे जायला दोर बांधलेला, कारण त्या पहील्या पॅचवर चालायला वाट नाहीच आहे, मोठी वजन बॅग व त्यावर मॅटच आवरण त्यामुळे थोड अवघड पडत होतं, पण हळुहळु पार करण्यात यशस्वी झालो. थोड पुढं आल्यावर किल्ले लिंगाण्याने दर्शन एकदम स्पष्ट दिलं, किल्याच्या अर्ध्यात सागर नलावडे {शिलेदार} व त्यांची टिम वर जाताना आम्हांला दिसले तिथुनच एकमेकांना रामराम केला व आम्ही लिंगाणा बेस कॅम्पजवळ ९:३० च्या सुमारास पोहचलो. लिंगाणा म्हणजे नुसता सुळका नव्हेच जणु ते पृथ्वीवरील शिवलिंगच भासते. महारांजानच्या काळात कारागृह म्हणुन वापर केला जाई, आणि आता किल्यावरील खुपश्या गोष्टी "बा रायगड" परिवाराने प्रकाशझोतात आणल्यात.....
आम्ही सोबत आणलेला ताक पिऊन लिंगाणा देवतेला नमस्कार करुन पाणे गावची वाट धरली. हीच वाट सर्वाधिक खडतर व उभी होती. जंगल कीर्र भरलेला, सुर्यकिरण पण आत पोहचत नव्हते, माणसाना वाकुनच चालाव लागत होते, वेळेला पाठीवरची बॅग हातात घेऊन आणि तसच बसुन चालाव लागत होत. बोराट्याच्या नाळेपेक्षा ही वाट भारी होती. दगड-धोंडे, रान तुडवत, बुजलेल्या वाटा शोधत-शोधत आम्ही लिंगाणा माचीजवळ पोहचलो... तिथे काही पुराणे वाड्याचे अवशेष दिसले. तिथुन पुढे पाणे गावात १:०० च्या सुमारास आलो. पाणे गाव हा आमचा चवथा टप्पा पार पडण्यास १ ते १:३० तास उशिर झाला असं मनात वाटत होत. पाणे गावात पोहचल्यावर श्री. दगडु मोरे यांना रजा दिली.... गावकर्‍याचं भाबड मन जाणवल.
पाणे गावातुन कसलीच सोय नसल्याने आम्ही वारंगी गावाच्या दिशेने निघालो. भुक लागल्याने अर्ध्यात एका मोठ्या झाडाच्या सावळीखाली शिदोरी सोडली व सोबत सुखा खाऊ होताच. थोड्या वेळाने परत वारंगी गावची वाट धरली....वाटेत छानशी नदी लागली त्यात मनसोक्त आंघोळ केली, सगळ कसं फ्रेश वाटु लागलं. आंघोळी आटोपुन २ पर्यत वारंगी गावात पोहचलो. लिंगाणा सुळका जस जसा दुर जात होता तसाच दुर्गेश्वर जवळ येत होता. वारंगी गावातुन आता छञीनिजामपुर साठीची वाट धरली. कारण छञीनिजामपुर पासुन ४ ची गाडी पाचाड खिंडीत पर्यत असेल अस गाववाल्यांनी सांगितले म्हणुन पायाला टाच मारली व सुटलो छञीनिजामपुराच्या मार्गाने बरोबर ४ ला पोहचलो पण तिथे रविवार असल्याने कोणतच साधन नव्हत, दिवसभरच्या मेहनतीने, न थांबता, न आराम करता चालल्याने थकवा जाणवत होता, आता अस वाटु लागल देवाला सुध्दा आमची परीक्षा घ्यायचीच होती....छञीनिजामपुर ते रायगड पायथा तासाच्या अंतरावर असल्याने आम्ही आमच्या शेवटच्या पाचव्या टप्प्यासाठी सज्ज झालो...किल्ले रायगड नजरे समोर धरुनच, जवळजवळ अर्ध्या गडाला वळसा मारत मारत, जस जस किल्ला जवळ येई तसतशी पावल भराभर पडु लागली.... दोन दिवसाच्या मेहनतीने आज दुर्गेश्वर जवळ करतोय ही जाणिव मनातले अंतरंग खुलवत होते..... बघता बघता पाचाड खिंडीत, त्या रायरेश्वरा समोर, चित्त दरवाजा म्होर ही पाच टवाळ पोर नतमस्तक झाली..... आमचं भाग्य थोर म्हणुनच हा दिस आम्हांस दिसला
आई तुळजा भवानी व महाराजांनच्या आर्शिवादाने आमच्या मोहीमेला पुर्णत्व लाभले......
आम्हांला मार्गदर्शन करणार्‍या सर्वच जणांनच तसेच अभिनंदन व शुभेच्छा देणार्या प्रत्येक व्यक्तिच, आमच्या सहकांर्यानच खुप खुप आभार.....ही मोहीम पुर्णत्वास जाण्यास तुमचा मोलाचा वाटा होता....पुन्हा एकदा धन्यवाद....
🚩आमचं इमान श्री शिवछञपतीनच्या चरणाशी...!🚩
मावळा मी त्या जगदंबेच्या भुत्याचा....
महेंद्र लिगम.....

Part 1 : गुंजवणे गाव ते राजगड : https://www.youtube.com/watch?v=jotrt11rjMQ
Part 2 :राजगड ते तोरणा : https://www.youtube.com/watch?v=1wDjA-5wJhQ
Part 3 : तोरणा ते लिंगाणा : https://www.youtube.com/watch?v=ixhgHM96_cs
Part 4 : लिंगाणा ते रायगड : https://www.youtube.com/watch?v=0n7U2plnJPY


Rajgad to Raigad Trek | R2RTrek | राजगड ते रायगड ट्रेक | Rajgad TO Raigad- hardest trek of Sahyadri | Rajgad To Raigad Range Trek | राजगड - तोरणा - लिंगाणा - रायगड ट्रेक | Rajgad - Torna - Lingana - Raigad Trek | Rajdhani to Rajdhani Trek | गडभ्रमंती

No comments:

Post a Comment